मराठी माणसाचं यश कुणाच्या डोळ्यांत खुपतंय?
येवले अमृततुल्य ग्राहकांचे अभिप्राय
तसं पाहायला गेलं तर मराठी माणसाचं व्यवसायाशी किंवा उद्योगधंद्याशी फार सख्य कधीच नव्हतं. फार पूर्वीपासून हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मराठी व्यावसायीक किंवा उद्योजक दिसून येतात. ती परिस्थिती या नव्या सहस्त्रकात थोडीफार बदलली आहे. तरीही जास्त करून सेवा क्षेत्रांत मराठी उद्योजकांचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं. व्यापार, हॉटेल, निर्मिती क्षेत्रात मराठी मंडळी कमीच दिसतात.
मग जेव्हा चर्चा होते, तेव्हा मराठी माणसाकडे कसं व्यावसायिकतेचा अभाव आहे, वेळ न पाळण्याची वृत्ती, फुकटचा अभिमान अशा दोषांची यादी दिली जाते. ही यादी सादर करून आपण पुढं जाणाऱ्या मराठी माणसाचं खच्चीकरण करतोय, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. बर ही कारण देणाऱ्यांनी तरी कधी व्यवसाय केलेला असतो का? तर बऱ्याचदा याचं उत्तर नाही असंच येतं. म्हणजे जर तुम्ही स्वत: पाण्यात न उतरता काठावर बसून पोहणाऱ्याला पाणी कसं खोल आहे हे सांगण्यासारखं आहे.
आधी म्हटल्याप्रमाणं या गेल्या काही वर्षात मराठी उद्योजकांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसतंय. धडाडीनं व्यवसायात उतरून, हिंमतीने तो यशस्वी करून दाखवायची धमक मराठी माणसाकडं येताना दिसते आहे. पण तरीही याला गालबोट लागतंय ते हे यश न पाहवणाऱ्यांचं.
ज्यांना काहीच करायचं नसतं त्यांचे काम खूप सोपं असतं. त्यांना फक्त काम करणाऱ्यांचे दोष दाखवायचे असतात. मग काही व्यवसायशत्रू अशा लोकांना हाताशी धरून आपला हेतू साध्य करतात, हे यांना कळतही नाही.
नव्या शतकात जागोजागी कॉफी शॉपस् दिसू लागली. मीटिंगच्या निमित्ताने, काम करायला, लोक तिथं जमू लागले. पण आपल्या चहाच्या हॉटेल्सच्या रुपाने ही संस्कृती पहिल्यापासून होती. पण चहा म्हणजे कमी दर्जाच्या लोकांसाठी, कळकट हॉटेलात मिळणारी वस्तू हे समीकरण बनले होतं. या समजाला पहिल्यांदा खोटं ठरवायचं काम केलं येवले अमृततुल्यनं. चकचकीत हॉटेल, स्वच्छ भांड्यातून आपल्या समोर बनवला जाणारा चहा, धुतलेले चिनी मातीचा कप, टापटीप, हसतमुख कर्मचारी असं त्यांनी चहाच्या दुकानांचं स्वरूप केलं. अल्पावधीत येवले चहा लोकप्रिय झाला. त्यांच्या असंख्य शाखा निघाल्या. जागोजाग येवलेंच्या दुकानांच्या धर्तीवर साईबा चहा, प्रेमाचा चहा, असे अनेक चहा दिसू लागले. त्यांच्याही शाखा उघडल्या गेल्या.
एका मराठी माणसाचं स्वकर्तृत्वावर हे लक्षणीय यश मिळवलं. जागोजागी येवले हे नाव झालं. पण ही लोकप्रियताच येवलेंच्या मुळावर उठली, असं दिसतंय. सुमारे सहा महिन्यांपूर्वी अशीच एक बातमी आली की येवलेंच्या दुकानांवर अन्न प्रशासन विभागाच्या म्हणजे FDA च्या धाडी. त्यांच्या चहात आक्षेपार्ह पदार्थ आढळले, इत्यादी. सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे. इथं वणवा पसरायला वारा लागत नाही. जो तो याचीच चर्चा करू लागला. खरं काय खोटं काय कुणालाच समजत नव्हतं. सुक्याबरोबर ओलंही जळावं तसं एक सांगतो म्हणून दुसरा असं करत येवले चहा पिणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. दुकानांसमोरच्या रांगा आटल्या.
पुढं यथावकाश FDA नं सर्व तपासण्या करून येवले चहाला ग्रीन सिग्नल दिला. चहात त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही. ही बातमीही वाऱ्यासारखी पसरली. लोकं पुन्हा येवले चहा पिऊ लागले. शाखाविस्तार सुरूच राहिला. पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली.
हे सगळं आता आठवायचं कारण म्हणजे जेव्हा अन्न विभागाने चौकशी केली आणि तक्रारीत तथ्य आढळलं नाही, तेव्हा कळलं की हे कुणीतरी खोडसाळपणे केलं होतं. येवलेंचं यश न पाहवल्यामुळं कुणीतरी मुद्दाम तक्रार केली होती. म्हणजे चालू गाड्याला खीळ बसून तो पु्न्ह पूर्ववत व्हायला कितीतरी दिवस जातात. ही गोष्ट व्यावसिकासाठी खूप मोठा फटका देते. भले भले यातून उभे राहत नाहीत. येवले पुन्हा उभे राहिले. कारण त्यांच्या प्रामाणिकपणे काम करण्याच्या वृत्तीमुळे.
आता पुन्हा एक बातमी वाचली की येवलेंविरूद्ध पुन्हा कोणीतरी तक्रार केली. आता यात किती तथ्य आहे, हे आपल्याला कालांतराने समजलेच. पण एक गोष्ट मात्र प्रकर्षांने जाणवते की मराठी माणूस पुढं गेलेला किंवा त्यानं प्रगती केली की लोकांना पाहवत नाही.
अशा प्रवृत्तींना थारा न देतां आपण मराठी माणसाच्या मागे उभं राहायला हवं. सरकार योग्य ती कारवाई करून निर्णय घेईलच. पण आपणही फार काही न करता अफवांवर विश्वास ठेवला नाही आणि आपल्याला माहिती नसताना चुकीच्या बातम्या पसरवल्या नाहीत, तर त्या व्यावसायीकाला नक्कीच मदत होईल.
Leave your comment
You must be logged in to post a comment.